नवी दिल्ली – झारखंडच्या एका न्यायाधीशाच्या अंगावर रिक्षा घालून त्यांची हत्या करण्याचा जो प्रकार घडला आहे त्याच्या सीबीआय चौकशीचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला असून त्याच्या तपास कामाचा दर आठवड्याला आढावा घेण्याची सुचना झारखंड हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना करण्यात आली आहे.
सीबीआयनेही दर आठवड्याला या तपास कामाचा अहवाल मुख्य न्यायाधीशांकडे सादर केला पाहिजे अशी सूचनाही सुप्रीम कोर्टाने केली आहे.
धनबादचे सेशन जज उत्तम आनंद यांची गेल्या महिन्यात ते मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्या अंगावर रिक्षा घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वत: दखल घेऊन या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे.