पुणे : दिवाळी, दसरा हे पारंपरिक सण आपण मोठ्या उत्साहात साजरे करतो. तसेच प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय सण देखील मोठ्या उत्साहात साजरे केले जावेत, या उद्देशाने २६ जानेवारी निमित्त कॅम्प येथील केअर टेकर सोसायटी तर्फे भव्य सर्वधर्मियांच्या एकत्रित आनंदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंदयात्रेस सुरूवात होणार आहे.
यावेळी पुण्यातील विविध शाळा, संस्था, मंडळ, महिला, पुरूष असे एक हजारहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत,अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुमार शिंदे म्हणाले, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून यात्रेची सुरूवात करणार असून देशाला संविधान देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून यात्रेचा समारोप करणार आहे. पुणे कॅन्टोन्मेट बोर्ड ते अरोरा टॉवर पर्यंत ही यात्रा असणार आहे.
पत्रकार परिषदेला पवन देडगावकर, विष्णू दोशी, संजय असरकर, अॅड प्रशांत यादव, शशिधर पुरम, उपस्थित होते.
या त्रेमध्ये पुण्यातील विविध शाळेचे विद्यार्थी राष्ट्र पुरूषांच्या वेशात सहभागी होणार आहेत. आनंदयात्रेत राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण, पाणी, स्वच्छता, आरोग्य, बेटी बचाव, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर जनजागृती करणार चित्ररथ असणार आहेत. तसेच विद्यार्थी या विषयांवर विद्यार्थी प्रबोधन करणार आहेत.
आनंदयात्रेत शिख धर्मगुरू ग्यानी, बिशप थॉमस डाबरे, मौलाना काझी इद्रिस, मौलाना काझमी, बोहरा समाजाचे धर्मगुरू, वारकरी संप्रदायातील विठ्ठल महाराज धोंडे, भंते असंग – फुले नगर आदी उपस्थित राहणार आहेत.