इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळेस विजयी झालेले आमदार दत्तात्रेय भरणे यांनी रविवारी (दि. 15) नागपूर येथे राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर तालुक्यातील गावागावात नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, पेढे भरवत मोठा जल्लोष केला. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून, आमदार दत्तात्रय भरणे यांची ओळख आहे. सन 2014पासून सलग सामान्य जनतेची नाळ आपल्या कर्तृत्वातून, घट्ट केल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात आजपर्यंत हजारो कोटींचा निधी आणला, शेकडो विकास कामे मार्गी लावली आहेत.
दक्षिण प्रयाग म्हणून प्रसिद्ध असणार्या क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान परिसराचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केला. आमदारकीच्या पहिल्याच संधीत गावा गावाला जोडणारे रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते, मूलभूत सुविधा, ड्रेनेज व्यवस्था तसेच प्रत्येक गावात विजेची सोय करण्याचे उत्तम काम, आमदार म्हणून मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पार पाडले होते. जंक्शन परिसरात औद्योगिक वसाहत एमआयडीसी साठी शासनाकडून मंजुरी, तसेच खंडकरी शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, कुगाव पूल उभारणी अशी असंख्य महत्त्वाची कामे मागील कालावधीत आमदार भरणे यांनी मार्गी लावलेली आहेत.
इंदापूर तालुक्यातील दुष्काळी 22 गावातील शेतीच्या पाणी प्रश्नासाठी, मनापासून काम करण्याची तळमळ व शेतकर्यांना पाणी शेतीसाठी मिळवून देण्याची भूमिका, मंत्री दत्तात्रय भरणे यांची राहिली. उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याच्या शेतकर्यांसाठी हक्काचे पाणी हा शेतीच्या पाण्याचा प्रश्न, मंत्री दत्तात्रय भरणे मार्गीच लावतील अशी अपेक्षा नागरिकांना शेतकर्यांना आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी इंदापूरकरांची गर्दी
राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पहिल्यांदाच इंदापूर तालुक्यातील सामान्य नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने नागपूरला रवाना झाले होते. आमदार भरणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी नागरिकांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
दत्तात्रय भरणे यांची राजकीय कारकीर्द
1992- संचालक, छत्रपती सहकारी साखर कारखाना
1998- संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक
2000- अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक
2002- अध्यक्ष, छत्रपती सहकारी साखर कारखाना
2009- विधानसभा निवडणुकीत पराभव (अपक्ष)
2012- जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड
2014- राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक विजयी
2019- दुसर्यांदा विधानसभेमध्ये आमदार
2021- राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री
2024- तिसर्यांदा विधानसभेमध्ये आमदार
2024- कॅबिनेट मंत्रीपद
फोटो ः अजित पवार, दत्तात्रय भरणे