“जेएसडब्ल्यू’चा राज्य शासनासोबत 35 हजार 500 कोटींचा सामंजस्य करार

मुंबई  – राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून आज नामांकित जेएसडब्ल्यू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे 35 हजार 500 कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आज झालेल्या करारानुसार जेएसडब्ल्यू कंपनी जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात काम करणार आहे.

 यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह जेएसडब्ल्यू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिझनेस हेड अभय याज्ञिक, प्रविण पुरी आदी उपस्थित होते.नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्‍यात सुमारे दीड हजार मेगा वॅट क्षमतेचा हायड्रोपॉवर प्रकल्प सुरू केला जाणार आहे.

 भिवली धरणावर हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे.कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यात 5 हजार मेगा वॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प सुरू करणार आहे. 

1879 हेक्‍टर जागेवर हा प्रकल्प असेल. यामध्ये सुमारे 30 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.आज झालेल्या दोन्ही सामंजस्य करारामुळे हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.