पेण : देशासह राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर पेण येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून मुंबई महानगर क्षेत्रासाठी १७० मेट्रिक टन आॅक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याची माहिती कंपनीचे महाव्यवस्थापक नारायण बोलबंडा यांनी दिली.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्राणवायूची कमतरता जाणवत असल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत. प्राणवायूअभावी रुग्णांची होणारी फरफट थांबवण्यासाठी औद्योगिक कंपन्यांमध्ये तयार होणारा ऑक्सिजन आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करून दिला जात आहे.
पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून मुंबई महानगर क्षेत्रासाठी दररोज १७० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. कंपनीत १०० व ७० मेट्रिक टन क्षमतेचे दोन ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत. यामध्ये तयार होणारा सर्व पुरवठा कोरोनाबािधत रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिला जात आहे, अशी माहिती कंपनीचे महाव्यवस्थापक नारायण बोलबंडा यांनी दिली. राज्यभरात ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता, नवीन ६५ मेट्रिक टन क्षमतेच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. तर आणखी ११५ मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव कंपनीने सादर केला आहे.