धाराशिव – मुलांच्या गटातून धाराशिव संघाने सांगली संघाला पराभूत करताना सुवर्ण महोत्सवी राज्य कुमार व मुली खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. धाराशिव संघाने कुमार गटाचे हे पहिलेच विजेतेपद आहे. अष्टपैलू कामगिरीसाठी धाराशिवच्या सोत्या वळवीला विवेकानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काल मुलींच्या गटातून धाराशिवने विजेतेपद पटकावल्याने धाराशिव संघाला दुहेरी मुकुटाचा मान मिळाला.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर मुलांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत जादा डावांमध्ये धाराशिवने सांगलीवर २३-२२ असा २.३० मिनिटे राखून १ गुणाने विजय मिळविला. शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात मध्यंतराला धाराशिव संघाने १०-७ अशी तीन गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र, सांगली संघाने दुसऱ्या डावात जोरदार मुसंडी मारत आक्रमण केले व धाराशिवला १६-१६ असे बरोबरीत रोखले. जादा डावात मात्र धाराशिवने २.३० मिनिटे राखून ७-६ अशी बाजी मारली.
नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण करणाऱ्या धाराशिवच्या सोत्या वळवीने १.५०, २.४० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात तीन गडी बाद केले. विलास वळवीने १.२० आणि १.५० मिनिटे असे संरक्षण करताना आक्रमणात दोन गडी बाद केले. हरदया वसावेने दोन मिनिट व एक मिनिट संरक्षण करताना आक्रमणात तीन गडी बाद केले. जितेंद्र वसावेने १.४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात चार गडी बाद केले. नितेश वसावेने १.१० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात पाच गडी टिपले.
सांगलीकडून प्रज्वल बनसोडेने १.१० व एक मिनिट संरक्षण करताना आक्रमणात सहा गडी बाद केले. अथर्व पाटीलने १.३०, १.१० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात ४ गडी बाद केले. आदर्श खतावेने आक्रमणात पाच गडी टिपत जोरदार लढत दिली पण दिवाळीने विजयाचे दान धाराशिवच्या पारड्यात टाकले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण अभिनेत्री भार्गवी चिरमुले, पोलिस उप-अधिक्षक दूलबा ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. वृषाली लामतुरे, डॉ. मिलिंद पोळ, प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, अर्जुन पुरस्कारप्राप्त सारिका काळे, संतोष साखरे, संघटक जनार्दन शेळके, महाराष्ट्र खो-खोचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा आदी उपस्थित होते.
मुलांच्या गटातील सर्वोत्तम खेळाडू
अष्टपैलू खेळाडू : सोत्या वळवी (धाराशिव)
संरक्षक : विलास वळवी (धाराशीव)
आक्रमण : प्रज्वल बनसोडे (सांगली).