अध्यक्षपदी झाली बिनविरोध निवड
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशाचे माजी आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांची आज जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष असलेल्या भाजपच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. नड्डा हे गृहमंत्री अमित शहा यांच्या निकटवर्तीय मानले जातात.
भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष राधामोहन सिंग यांनी आज जे पी नड्डा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नड्डा यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले होते. आता ते पूर्णवेळ अध्यक्ष झाले असून 2022पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल.
भाजप मुख्यालयात सकाळी साडेदहा वाजल्यापासून अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी केवळ जे. पी. नड्डा यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. दुसरा कोणताही अर्ज न आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. लोप्रोफाइल असलेले आणि वादग्रस्त वक्तव्यापासून दूरच राहणारे अतिशय प्रभावी नेते अशी नड्डांची ओळख आहे. नड्डा यांचा कार्यकाळ 2022 पर्यंत असणार आहे. राधामोहन सिंह यांनी नड्डा यांचे नाव जाहीर केल्यानंतर मावळते भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले.
राज्यसभा सदस्य असलेले जे. पी. नड्डा पक्षाच्या सर्वोच्च संसदीय बोर्डचे सचिवही आहेत. मोदी सरकारच्या गेल्या कार्यकाळात त्यांनी आरोग्य मंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. विद्यार्थी जीवनापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघटनेत त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते पहिल्यांदा 1993मध्ये हिमाचल प्रदेशमधून विधानसभेवर निवडून गेले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2010मध्ये भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नड्डा यांना देशाच्या राजकारणात आणले होते. गडकरी यांनी नड्डा यांना महासचिव पदाची जबाबदारी दिली होती.