कराड-चिपळूण मार्गावर जिवंतपणी मृत्यूचा प्रवास

वाहनांमुळे उडणाऱ्या धुरळ्याने प्रवाशांचे होताहेत हाल

पन्नास पादचाऱ्यांचा मृत्यू

कराड-चिपळूण महामार्गावर प्रवास करणाऱ्या पन्नास पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. सुपने, तांबवे, येरफळे, लगडेवाडी, निसरे, विहे याठिकाणी वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत पन्नास जणांचा जीव गेला आहे. तर शेकडो प्रवाशी जखमी झाले आहेत. याला जबाबदार कोण? हा प्रश्‍न असून ठेकेदार कंपनीने या अपघातात मृत्यू व जखमी होणाऱ्या प्रवाशांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

सूर्यकांत पाटणकर

पाटण – एल ऍण्ड टी कंपणी ठेकेदार असलेल्या कराड-चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या चालू आहे. विजयनगरपासून ते हेळवाकपर्यंतच्या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या हजारो झाडांची कत्तल केल्याने प्रवाशांना आगीतून प्रवास करत असल्याचा अनुभव दररोज येत आहे. तर वाहनांमुळे उडणारा धुराळा प्रवाशांच्या नाकातोंडात जात असल्याने जिवंतपणी मरणाच्या प्रवासाचा अनुभव या रस्त्यावर प्रवास करताना होत आहे.
कराड-चिपळूण या मार्गावरील रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कराडच्या पश्‍चिमेस असणाऱ्या कोकण विभागाला जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम या रस्त्यामुळे होणार आहे. मात्र या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा तोडण्यात आलेल्या झाडांची किंमत या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना होत आहे. पन्नास ते साठ वर्षांच्या झाडांची कत्तल या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी करण्यात आली आहे. कराडपासून कोयनानगरपर्यंत महाकाय असणारी झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना आगीतून प्रवास करत असल्याचा अनुभव सध्या प्रवाशांना होत आहे.

यावर्षी उष्णतेची तिव्रता वाढली आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हातून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. उन्हाळी सुट्ट्या, लग्नसमारंभ यामुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळ होताना दिसत आहे. कराड-चिपळूण मार्ग हा कोकणाला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने कोकणात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यातच या रस्त्याचे काम चालू असून दुतर्फा रस्ता उखडण्यात आला आहे. मुख्य ठेकेदार कंपणी आसणाऱ्या एल ऍन्ड टी कंपनीने या कामाचा ठेका घेतला आहे.

वाहनांसाठी मुरूम मातीची भर घालून पर्यायी सेवारस्ता निर्माण करण्यात आला आहे. मात्र ठेका घेतलेल्या कंपनीने पोट ठेकेदाराने ठरावीक अंतराचे काम त्यांना दिले आहे. या ठेकेदारांनी संपूर्ण रस्ता उखडून टाकल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अवजड वाहनांमुळे धुळीचे लोट निर्माण होत असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अगदी नाकातोंडात धुरळा जात आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात प्रचंड त्रास प्रवाशांना होत आहे.
ज्या ठिकाणी रस्ते उखडण्यात आले आहेत. त्याठिकाणी रस्त्यावर पाणी मारण्याचे काम ठेकेदार कंपनीचे आहे. मात्र प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंपणीला या मार्गावर प्रवासी वाहतूकदार यांच्या सुरक्षित प्रवासाचे काहीही देणेघेणे नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

एकाबाजूला उखडलेला रस्ता तर दुसऱ्या बाजूला अवजड वाहनांमुळे उडणारी धूळ तर वर रखरखत्या उन्हामुळे कराड-चिपळूण रस्ता वाहन धारकांसाठी जिवंतपणी मरणाचा प्रवास ठरत आहे. रात्री-अपरात्री शेकडो वाहने या रस्त्यावरून ये-जा करत आहेत. चिपळूण व पाटणसाठी मोठी बाजारपेठ आसणाऱ्या कराडला जाण्या-येण्यासाठी दररोज हजारो चाकरमान्यांची रीघ असते. त्यामुळे वाहनांच्या रांगा या मार्गावर लागलेल्या असतात. ठेकेदार कंपणीने ज्याठिकाणी रस्ता खोदला आहे. त्यासाठी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. तसेच वाहन धारकांसाठी बनविण्यात आलेला सेवारस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का हे न पाहता कंपणीच्या ठेकेदारांनी हा रस्ता अतिशय ओबडधोबड बनवला आहे. त्यामुळे रस्त्यावर खाचखळगे निर्माण होवून दररोज अपघात होत आहेत तर निर्माण करण्यात आलेल्या सेवा रस्त्यावर पाणी न मारल्याने धुळीचे लोट निर्माण होत आहेत.अवजड वाहने गेल्यानंतर उडणारे धुळीचे लोट अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहेत. याबाबत प्रवाशी व रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दररोज वाद होताना दिसत आहेत. ठेकेदार कंपणीने सेवारस्ता वाहतुकीसाठी सुरळीत सुरक्षित निर्माण करावा व रस्त्यावर वेळोवेळी पाणी मारावे, अशी अपेक्षा वाहनधारक प्रवाशांमधून व्यक्‍त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.