नवी दिल्ली : देशात मागील १० दिवसांपासून इंधनात वाढत होत असल्याचे दिसत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. याच पार्श्वभूमीवर योगगुरु रामदेव बाबा यांना पत्रकाराने प्रश्न विचारला असता रामदेव बाबा चांगलेच पत्रकारावर भडकल्याचे दिसले.
हरियाणामधील कर्नल येथे आयोजित एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी उपस्थिती लावली. यावेळी एका पत्रकाराने लोकांनी ४० रुपये प्रतिलीटर आणि स्वयंपाकाचा गॅस ३०० रुपये सुनिश्चित करू शकणार्या सरकारचा विचार केला पाहिजे असे म्हटले होते याची आठवण करुन देत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रामदेव बाबांचा पारा चांगलाच चढला. “हो मी तसं म्हणालो होतो, तुम्ही काय करु शकता? मला असे प्रश्न विचारत जाऊ नका. मी तुमचा कंत्राटदार आहे का? जो सतत तुमच्या प्रश्नांना उत्तर देत बसणार?,” अशी विचारणा रामदेव बाबांनी केली.
“चुप हो जा, आगे से पूछेगा तो ठीक नहीं होगा” pic.twitter.com/tdcZjkKHOR
— Ranvijay Singh (@ranvijaylive) March 30, 2022
पत्रकाराने पुन्हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता रामदेव बाबा आणखी संतापले आणि त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाले, “हो मी केलं होतं वक्तव्य, तू काय करणार आहेस? शांत राहा, परत विचारलंस तर तुझ्यासाठी हे चांगलं नसेल. अशा पद्दतीन बोलू नकोस, तू एका चांगल्या आई-वडिलांचा मुलगा असावास”.
रामदेव बाबा यांनी यावेळी लोकांना कठीण वेळेत जास्त परीश्रम घ्या असा सल्ला दिला. “सरकार म्हणतं जर इंधनाचे दर कमी असतील तर त्यांना कर मिळणार नाही मग ते देश कसा चालवणार? पगार कसे देणार? रस्ते कसे बांधणार? महागाई कमी झाली पाहिजे याच्याशी मी सहमत आहे, पण लोकांनी जास्त मेहनत घेतली पाहिजे. मीदेखील पहाटे ४ वाजता उठतो आणि रात्री १० पर्यंत काम करत असतो,” असं रामदेव बाबांनी म्हणताच त्यांच्या शेजारी बसलेले समर्थक टाळ्या वाजवू लागले.