जोतिबाच्या नावानं चांगभलं..! लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री जोतिबाची यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न

मानाच्या सासनकाठीचे जिल्हाधिऱ्यांच्या हस्ते पूजन
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांच्याहस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासनकाठी क्रमांक एक या मानाच्या सासनकाठीचे पूजन करण्यात आले.

जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात, गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आदि राज्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाची यात्रा भक्तीमय वातावरणात पार पडली. उंच सासनकाठ्या नाचवत व गुलाल-खोबरे उधळत भाविक देहभान विसरुन यात्रेत सहभागी झाले होते. विविध रंगांच्या सासनकाठ्यांमुळे जोतिबा मंदिराची शोभा वाढली. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह अन्य मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार सत्यजित पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, तहसिलदार रमेश शेडगे, नायब तहसिलदार अनंत गुरव, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगिता खाडे, उपस्थित होते.

श्री जोतिबा यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा कुलस्वामी श्री जोतिबाच्या यात्रेसाठी लाखोंचा भाविक जमला असून या यात्रेचे जिल्हा प्रशासन देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीने नेटके नियोजन केले असून पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. उन्हाळा असल्याने भाविकांनी सुखरुप, शिस्तबध्दरित्या आणि शांततेत यात्रा पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी सहजसेवा ट्रस्टच्यावतीने गायमुख परिसरात सुरू केलेल्या अन्नछत्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी राजर्षि छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर हॉस्पिटल यांच्यावतीने रक्तदान फिरत्या वाहन उपक्रम राबविण्यात आला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.