पुणे – बदलत्या काळात युद्धपद्धतींसोबतच युद्धाभ्यासाची माध्यमेदेखील बदलत आहेत. तंत्र अभ्यासाच्या सहाय्याने युद्धाभ्यास करण्याकडे सैन्यदलाचा ओघ वाढत असून, लवकर तिन्ही दलांसाठी संयुक्त “वॉरगेम’ तयार केले जाणार आहेत. लवकरच यासंदर्भातील अभ्यास डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीतर्फे (डाएट) केला जाणार आहे.
काळानुरूप युद्धाभ्यासाची माध्यमे बदलत आहे. याचाच एक भाग म्हणजे “वॉर गेमिंग’ होय. संगणकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आभासी युद्धस्थिती निर्माण करून, त्यानुसार युद्ध लढण्याचा प्रयत्न या वॉरगेमिंगद्वारे केला जातो. विशेषत: नौदलात अशाप्रकारचे वॉरगेमिंग सर्वाधिक वापरले जाते. “डाएट’तर्फे नुकतेच नौदल वॉरगेमिंगच्या अत्याधुनिकीकरणासाठी विशेष वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नौदलाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले असून, वॉरगेमिंगमध्ये आवश्यक बदलांबाबत अभ्यास केला जाणार आहे. ही संकल्पना केवळ नौदलापुरती मर्यादित न ठेवता तिन्ही दलांसाठी ती विकसित व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विशेषत: नव्यानेच उदयास येणाऱ्या संयुक्त युद्धाभ्यासासाठी वॉरगेमिंगचे महत्व लक्षात घेता, तिन्ही दलांसाठी उपयुक्त ठरणारे संयुक्त “वॉरगेम’ तयार करण्यासाठीदेखील डाएटतर्फे प्रयत्न केले जात आहे.
इंटिग्रेटेड वॉरगेमिंग म्हणजेच संयुक्त वॉरगेम्स विकसित करण्यासाठी आवश्यक अभ्यासवर्गाबाबत लष्कर आणि हवाईदल यांच्या मुख्यालयाशी संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळताच, हा विशेष अभ्यास वर्ग आयोजित केला जाईल.
– ए.के. सिन्हा, “डाएट’चे प्राध्यापक तथा कमोडोर (नि.)