पालिकेच्या आरोग्य विभागात 150 डॉक्टरांसह 170 परिचारिका रुजू
पुणे – सुमारे 150 डॉक्टरांसह 170 परिचारिका महापालिका आरोग्य विभागात रुजू झाले आहेत. मुलाखतीतून या डॉक्टर आणि परिचारिकांची निवड करण्यात आली. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी 6 महिन्यांसाठी राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमधून त्यांना “जॉईनिंग लेटर’ देण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला काही अंशी दिलासा मिळाल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.
करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दरदिवशी हजार रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने तेथील हंगामी भरतीसाठी मे महिन्यात जाहिरात दिली होती. त्यामध्ये डॉक्टर, तंत्रज्ञ, परिचारिका अशा विविध पदांसाठीच्या भरतीचा समावेश होता. परंतु, वेतन असमाधानकारक असल्याने त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे पुन्हा वाढीव मानधनानुसार जाहिरात देण्यात आली. त्याला प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर मागील आठवड्यात डॉक्टर्स, नर्सेस आणि तंत्रज्ञ यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार या नेमणुका होत असून पालिकेने सहा महिन्यांच्या करारावर नियुक्तीपत्रे दिली आहेत. ही नियुक्ती पत्रे घेतलेल्यांपैकी बहुतांशजण कामावर रुजू झाले आहेत. त्यांना शहरातील 24 कोविड केअर सेंटर्ससह डॉ. नायडू रुग्णालय, दळवी रुग्णालय येथे आवश्यकतेनुसार नेमणुका देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोविड सेंटर्सवर बरेच दिवस सलग काम करत असलेल्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
महापालिकेने राबवलेल्या भरती प्रक्रियेद्वारे आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. निवड करण्यात आलेल्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. त्यांना विविध सेंटर्सवर नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय मनुष्यबळात भर पडली असून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
– डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य अधिकारी