नवी दिल्ली – भारत सरकारने भारतामध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती व्हावी याकरिता व्यापक उपाययोजना केल्या आहेत. भारत सरकारने सुरू केलेल्या या सेमीकंडक्टर मोहिमेत अमेरिकेतील उद्योजकांनी सहभागी व्हावे असा आग्रह अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.
अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये सेमीकंडक्टर निर्मितीचा उद्योग एकवटलेला आहे. भारत सरकारने भारतात सेमीकंडक्टर निर्मिती वाढावी यासाठी काय उपाय योजना केल्या आहेत आणि कोणत्या सवलती दिल्या आहेत याची माहिती सिताराम यांनी दिली. त्यामुळे अमेरिकेतील सेमीकंडक्टर उत्पादकांनी भारतात उत्पादन केल्यास त्यांना दीर्घ पल्ल्यांमध्ये लाभ होणार आहे.
भारत सरकारने गेल्या वर्षी सेमीकंडक्टर आणि इतर उद्योगासाठी 76 हजार कोटीची उत्पादन आधारित अनुदान योजना सुरू केली आहे. त्यामुळे भारतामध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रात संशोधन आणि विकासापासून ते मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या परिषदेमध्ये अमेरिकेतील उद्योजकांनी भारतामध्ये डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, तंत्रज्ञान विकास या क्षेत्रामध्ये काम सुरू केले आहे. आगामी काळामध्ये यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले.
करोनाच्या काळात सेमीकंडक्टरचा उपयोग विविध क्षेत्रात वाढल्यामुळे सेमीकंडक्टरची प्रचंड टंचाई जागतिक बाजारपेठेत निर्माण झाली आहे. त्याचा भारतातील वाहन उद्योगासह इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या उद्योगावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारत सरकारने सेमीकंडक्टर क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होण्याचा निश्चय जाहीर केला आहे. याची माहिती सीतारामन यांनी दिली. भारतामध्ये सेमीकंडक्टर उद्योगासाठी आवश्यक असे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्याचा वापर या उद्योगाने करून घ्यावा असे सीतारामन म्हणाल्या.