सध्या संपूर्ण देशातील जनता लॉकडाऊनमुळे आपापल्या घरांत बंदिस्त आहे. सिनेकलाकारांनाही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडता येत नाहीये. त्यामुळे बोअर झालेल्या आणि त्यातूनही मिळालेला वेळ सत्कारणी लावणाऱ्या कलाकारांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यादरम्यान बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी लिव्हर यांनी एक गमतीशीर व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
या व्हिडिओमध्ये ते एक किस्सा सांगताना दिसत आहेत. जॉनी म्हणतात, “घरामध्ये माणूस किती वेळ बसणार? बातम्या किती वेळ बघणार? असा विचार करून मी घराबाहेर पडण्याचा विचार करत होतो. पण तेवढ्यात आई मला ओरडू लागली.” जॉनी सांगतात की मी घरी जेव्हाही बोअर होऊ लागतो तेव्हा आई ओरडून विचारते “कुठे चाललास’? मी सांगतो, “जरा खाली चाललो आहे. भटकून-पाय मोकळे करून येतो.’ पण आई म्हणते, ” बस इथे. कुठेही जायचे नाही. टीव्हीवर अमिताभ बच्चननीही सांगितले आहे घरातून कुठेही जाऊ नका. 15-20 दिवस घरात बसलास तर काहीही फरक पडत नाही’ !
अत्यंत विनोदी अंगाने तयार केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जॉनींनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानेच घरी राहण्याचे आवाहनही केले आहे.