पुणे – इंग्लंड संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी ऍशेस कसोटी मालिकेत पूर्ण ताजातवाना होत सहभागी होता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने म्हटले आहे.
पाचवा टी-20 सामना पार पडल्यावर इंग्लंड संघ व्यवस्थापन आर्चरबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दुखापतीमुळे आर्चरने भारताविरुद्धचा चौथा कसोटी सामना खेळला नव्हता. त्यानंतर टी-20 मालिकेतही त्याच्या खेळण्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी आर्चर पूर्ण तंदुरुस्त झाला. त्याने मालिकेतील चारही सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. सध्या तो मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.
टी -20 मालिकेदरम्यान जोफ्रा आर्चरला कोणतीही समस्या उद्भवली नसली, तरी संघ व्यवस्थापन त्याच्यावर जास्त ताण येऊ नये, असा विचार करत आहे. यामुळे त्याला एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती दिली गेली आहे.
यावर्षी टी-20 विश्वकरंडक तसेच ऍशेस मालिकादेखील होणार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला आर्चरबाबत कोणतीही जोखीम घ्यायची इच्छा नाही. आर्चरला विश्रांती देतानाच पर्यायी वेगवान गोलंदाजांना भारतीय संघाविरुद्ध खेळवण्यात येणार असून त्याद्वारे त्यांनाही आगामी मालिकांसाठी सराव मिळणार आहे.