George Soros Gets Presidential Medal of Freedom: अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडन यांनी व्हाइट हाऊसमध्ये 19 जणांना प्रतिष्ठित प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित केले आहे. हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कार समजला जातो. या पुरस्काराने सन्मानित व्यक्तींमध्ये उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या नावाचा देखील समावेश आहे. सोरोस हे नाव भारतीय राजकारणात देखील मागील काही वर्षात चर्चेत राहिले आहे.
सत्ताधारी भाजपकडून सोरोस यांच्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसवर सातत्याने निशाणा साधण्यात आला आहे. त्यामुळे आता अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कार सोरोस यांना देण्यात आल्याने त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोरोस यांच्यावतीने त्यांचा मुलगा अॅलेक्सने हा पुरस्कार स्विकारला.
जॉर्ज सोरोससोबतच अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन, फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी, फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन, अभिनेता डेन्झेल वॉशिंग्टनसह इतर काही व्यक्तींचा देखील या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
2023 मध्ये जॉर्ज सोरोस यांनी म्युनिकमधील संरक्षण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. सीएए आणि कलम 370 हटवण्यावरूनही त्यांनी टीका केली होती. त्यानंतर सातत्याने भाजपकडून सोरोस यांच्यावर निशाणा साधला जात आहे. जॉर्ज सोरोस यांना पुरस्कार देण्याचे कारण सांगताना व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की, त्यांनी लोकशाही, मानवाधिकार, शिक्षण आणि सामाजिक न्याय मजबूत करणाऱ्या जगभरातील संस्थांना पाठिंबा दिला आहे.
कोण आहेत जॉर्ज सोरोस?
जॉर्ज सोरोस हे एक अमेरिकन उद्योजक आहेत. जन्म 12 ऑगस्ट 1930 रोजी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झाला. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. सुरुवातीला त्यांनी रेल्वे पोर्टर आणि वेटर म्हणूनही काम केले. त्यानंतर ते शेअर मार्केटकडे वळाले. यातूनच त्यांनी कोट्यावधी रुपयांची कमाई केली.
1979 मध्ये त्यांनी ओपन सोसायटी फाउंडेशनची स्थापना केली. ही संस्था विविध देशांमध्ये कार्यरत आहे. 1999 मध्ये पहिल्यांदा या संस्थेने भारतात प्रवेश केला. या संस्थेद्वारे औषधोपचार, न्याय व्यवस्था सुधारणाऱ्या आणि अपंग लोकांना मदत करणाऱ्या इतर संस्थांना निधी पुरवला जात होता. मात्र, नंतर निधी देण्यावर बंदी घालण्यात आली होती.
ते अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक पक्षाला सर्वाधिक फंड देणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. तसेच, त्यांना डावे विचारसरणीचे समजले जाते. त्यामुळे अनेक देशातील उजव्या विचारसरणीच्या पक्षांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जातो.