न्यूयॉर्क – अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुर्टेरेस यांच्याशी जागतिक विषयांवर प्रथमच चर्चा केली. जागतिक समस्या सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांना साथ देण्याची ग्वाही बायडेन यांनी यावेळी दिल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा दूरध्वनीवरून झाली.
करोना प्रसार, त्यामुळे निर्माण झालेली आरोग्य क्षेत्रातील आव्हाने, वातावरणातील बदल, शांतता स्थैर्य टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हाती घेतलेले उपाय आदी विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली असे सांगण्यात येते.
जगातील लोकशाही मूल्यांना अनेक ठिकाणी आव्हान दिले जात असून ही मूल्ये आणि मानवाधिकार कायम ठेवण्यासाठी व त्याची बूज राखण्यासाठीही व्यापक उपाययोजना करण्याची गरज गुर्टेरेस यांनी यावेळी व्यक्त केली व या कामी अमेरिकेचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याला बायडेन यांनी विधायक प्रतिसाद दिला.
इथोपियात सध्या हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यावरही बायडेन यांनी यावेळी चिंता व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रप्रमुखांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल बायडेन यांचे अभिनंदनही केले.