वॉशिंग्टन – अमेरिकन अध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांनी म्हटले आहे अमेरिकेतील करोनाला हरवायचे असेल तर प्रथम डोनाल्ड ट्रम्प यांना हरवणे गरजेचे आहे.
त्यासाठी अमेरिकन नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मोठ्या प्रमाणावर मतदान केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
अमेरिकेत अध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान होत असले तरी तेथे पोस्टाने किंवा ई-मेलने दहा कोटी लोकांपेक्षा अधिक मतदारांनी या आधीच मतदान केले आहे. मंगळवारी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन सुमारे सहा कोटी लोक मतदान करतील, अशी अपेक्षा आहे.
बिडेन म्हणाले की, ट्रम्प यांनी कितीही निकराचा प्रचार केला किंवा ते काहीही म्हणाले तरी लोकांनी जे ठरवले आहे तेच होणार आहे. लोकांची मते बदलण्यास ट्रम्प यांना कदापिही यश येणार नाही. ट्रम्प यांनी लोकांना मतदान करण्यापासूनच दूर ठेवण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
लोकांनी मतदानालाच बाहेर पडू नये अशी त्यांची एकूण रणनीती दिसत असली तरी लोक मोठ्या प्रमाणावर मतदानाला जातील आणि ते ट्रम्प यांना धडा शिकवतील, असे बिडेन यांनी नमूद केले. ट्रम्प यांच्या घरी जाण्याची वेळ आली असून त्यांनीही आवराआवरी करून घरी जाण्याची तयारी करावी, अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी केली आहे.