वॉशिंग्टन – चीनच्या वाढत्या कुरापतींना आळा घालण्यासाठी अमेरिकेने आता स्वतंत्र “टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आज याबाबतची घोषणा केली. चीनच्या कुरापतींना तोंड देण्यासाठी या “टास्क फोर्स’च्या माध्यमातून संरक्षण विभागाला शिफारसी केल्या जाणार आहे.
हा “टास्क फोर्स’ वेगाने काम करेल आणि यामध्ये संरक्षण विभागातील नागरी आणि लष्करी तज्ञांचा समावेश असेल. चीन-संबंधित बाबींविषयी समर्थपणे कार्यवाही करण्यासाठी मुख्य संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना शिफारसी देईल.
हा नवीन गट धोरणात्मक आणि कृतीबाबतच्या संकल्पनांची अंमलबजावणी, तंत्रज्ञान आणि बळाचा वापर यावर विचार करेल. शांतता कायम ठेवण्यासाठी आणि अमेरिकेच्या हितांचे रक्षण करण्यासाठी भारत-प्रशांत क्षेत्र आणि जगभरातील चीनच्या वाढत्या आव्हानांचा सामना करण्याची गरज आहे, असेही बायडेन यांनी सांगितले.
15 सदस्यांच्या “टास्क फोर्स’मध्ये संरक्षण धोरण, चीनी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अमेरिकेच्या आशियामधील भागीदारांसह एक विस्तृत पोर्टफोलिओ असेल, असेही बायडेन म्हणाले.