-->

करोना लढ्यात मृत पुणे पालिकेच्या कर्मचारी कुटुंबीयांना नोकरी

22 फेब्रुवारीच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय होण्याची शक्‍यता

पुणे – करोना विरोधातील लढ्यात मरण पावलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने जाहीर केल्याप्रमाणे आर्थिक मदत तसेच कुंटुंबातील एका व्यक्‍तिला नोकरी देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. यासंदर्भात येत्या 22 फेब्रुवारीला उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर यांनी बुधवारी मुख्यसभेत दिली.

मागीलवर्षी मार्चमध्ये शहरात करोनाचा संसर्ग सुरू झाला. जगभरात दहशत माजवणाऱ्या करोनाविरोधात लढा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच सर्व स्तरातील नागरिकांचे मोठे योगदान आहे. करोनाला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य तसेच प्रशासकीय सेवकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने पाठबळ म्हणून विविध योजना जाहीर केल्या आहेत.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनीदेखील याच पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार आणि महापालिकेच्या कामगार निधीतून करोनाविरोधात पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये किंवा 25 लाख रुपये आणि मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयातील एकाला महापालिकेमध्ये नोकरीची घोषणा केली होती. त्यानुसार मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात झाली परंतु अद्याप नोकरी देण्यात आली नाही.

आतापर्यंत 44 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. विशेषत: चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांची ससेहोलपाट होऊ लागली आहे. या कुटुंबांना आधार देण्यासाठी नोकरीसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कामगार संघटनांसोबतच बुधवारी विविध पक्षाच्या सदस्यांनी मुख्यसभेमध्ये केली. याविषयी दौंडकर यांनी मुख्यसभेला वरील माहिती दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.