कामांची माहिती अपडेट्‌ करण्यास “टाळाटाळ’

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

 

पुणे – महापालिकेने शहरात केलेल्या विकासकामांची माहिती एकाच ठिकाणी तसेच शास्त्रोक्‍त पद्धतीने एकत्रित व्हावी या उद्देशाने महापालिका प्रशासनाने “एन्टर प्रायजेस जीआयएस’ प्रणाली विकसित केली आहे. या प्रणातील प्रत्येक विकासकामांच्या निविदा, कामाची माहिती तसेच फोटो आणि प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणाची माहिती गुगल मॅपवर अपडेट करणे आवश्‍यक आहे.

मात्र, या प्रणालीला महापालिकेच्या अनेक विभागांनी हरताळ फासला आहे. अनेक विभागांकडून ही कामेच अपडेट केली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्‍तांनी डिसेंबर 2020 मध्ये या प्रणालीत विकासकामे तातडीने दर्शविण्याचे आदेश दिले होते. मात्र, आयुक्‍तांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. आयुक्‍तांच्या आदेशानंतरही अनेक विभाग प्रमुखांकडून ही माहिती अद्याप अपडेट होत नसल्याने या कामासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

शहरातील पालिका जागा तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी पालिकेकडून विकासकामे केली जातात. या कामांची एकत्रित माहिती कुठेही नसते. त्यामुळे प्रशासनाकडून या कामांच्या जागा तसेच निविदा, केलेल्या कामांची माहिती एकाच ठिकाणी एका क्‍लीकवर सर्व विभाग प्रमुखांना उपलब्ध व्हावी या उद्देशाने “निविदा एन्टर प्रायजेस जीआयएस’ प्रणाली विकसिक केली.

त्यात, कामाच्या ठिकाणाचे अक्षांश व रेखांशसह केलेल्या कामाची सर्व माहिती भरली जाते. त्यामुळे नवीन काम करताना संबंधीत जागेवर या पूर्वी काही काम केले आहे का याची माहिती एका क्‍लीकवर उपलब्ध होणे शक्‍य होणार आहे. तसेच, एकाच कामावर वारंवार होणाऱ्या खर्चाला मर्यादा येणार आहेत. मात्र, त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांची दुकानदारी बंद होणार असल्याने ही माहिती संबंधीत संगणक प्रणालीत अपडेट करण्यास टाळाटाळ होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.