Job In Russia: युक्रेनसोबतच्या प्रदीर्घ युद्धामुळे रशियात मनुष्यबळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, रशियाने आता भारतीय कामगारांकडे आपला मोर्चा वळवला असून, या वर्षाच्या अखेरीस सुमारे ४० हजार भारतीय मजुरांना रशियात रोजगाराची संधी मिळण्याची शक्यता आहे. ‘डॉयचे वेले’ (DW) च्या एका ताज्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. ८० हजार भारतीय आधीच रशियात कार्यरत – अहवालातील माहितीनुसार, गेल्या वर्षाच्या अखेरपर्यंत सुमारे ७० ते ८० हजार भारतीय नागरिक रशियात विविध क्षेत्रांत काम करत होते. मजुरांच्या कमतरतेमुळे रशियाकडून सातत्याने भारताला कामगार पाठवण्याचे आवाहन केले जात आहे. विशेषतः बांधकाम, रस्ते निगा आणि नगरपालिका सेवांमध्ये या कामगारांची मोठी मागणी आहे. भारत-रशियामध्ये महत्त्वपूर्ण करार – भारतीय कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी गेल्या डिसेंबरमध्ये भारत आणि रशिया दरम्यान दोन महत्त्वाचे करार झाले आहेत. या करारामुळे अर्ध-कुशल (Semi-skilled) आणि कुशल (Skilled) कामगारांना रशियात कामासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध झाली आहे. यापूर्वी काही भारतीयांना चुकीच्या माहितीच्या आधारे रशियात नेऊन त्यांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर हे करार अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. Russia सॉफ्टवेअर प्रोफेशनलवर रस्ते सफाईची वेळ – रशियातील कामगारांच्या टंचाईचे गांभीर्य एका घटनेवरून स्पष्ट झाले आहे. ‘फोंटांका’ या रशियन मीडिया प्लॅटफॉर्मने दिलेल्या वृत्तानुसार, सेंट पीटर्सबर्गमध्ये रस्ते साफसफाईसाठी गेलेल्या १७ भारतीयांमध्ये एका तरुण सॉफ्टवेअर प्रोफेशनलचाही समावेश होता. रशियात सध्या मॅन्युअल लेबर आणि महापालिका सेवांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती भरून काढण्यासाठी परदेशी स्थलांतरितांवर अवलंबून राहावे लागत आहे. रशियात ३० लाख कुशल व्यावसायिकांची गरज – भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनीही भारतीय तरुणांच्या कौशल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी म्हटले की, “रशियामध्ये सध्या सुमारे ३० लाख कुशल व्यावसायिकांची आणि ५ लाख अर्ध-कुशल मजुरांची कमतरता आहे. भारताची तरुण आणि कष्टाळू वर्कफोर्स ही गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे.” रशिया सध्या आपल्या मित्र देशांशी संपर्क साधून ही मजुरांची कमतरता भरून काढण्याचे प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये भारताचा वाटा सर्वाधिक असण्याची चिन्हे आहेत.