नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला असून त्यांनी विद्यापीठांतील वर्गांवरही बहिष्कार घातला आहे. घोषणाबाजी करत आंदोलक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारात रॅली काढली आणि विविध वर्गांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना बहिष्काराचे आवाहन केले.
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनने एप्रिलमध्ये कुलगुरू संतश्री डी पंडित यांना सादर केलेल्या मागण्यांबाबत विद्यापीठ प्रशासने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. विद्यापीठाच्या या कथित असंवेदनशीलतेचा निषेध नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा संप आयोजित केला आहे.
त्यांच्या मागण्यांमध्ये मेरिट-कम-मीन्स शिष्यवृत्तीची रक्कम किमान ५ हजार रुपयांपर्यंत वाढवणे आणि त्याची व्याप्ती बी.टेकच्या विद्यार्थ्यांपर्यंत वाढवणे, बराक वसतिगृहाचे जलद नूतनीकरण सुरू करणे अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. हे वसतिगृह उद्घाटन झाल्यापासून सुरू झाले नाही. गेल्या एप्रिल पासून विद्यार्थि या मागण्या करीत आहेत, पण त्यांच्या मागण्यांवर कुलगुरूंनी दाद दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे संपाचे व बहिष्काराचे हत्यार उपसले आहे.