नवी दिल्ली : अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पाठिंब्याचे स्वागत होत आहे.
भाजप नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी दीपिका पदुकोण यांच्यावर टीका केली आहे. दीपिका पदुकोण तुकडे तुकडे गॅंगची सदस्य असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच दीपिका यांच्या आगामी येणाऱ्या ‘छपाक’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. यानंतर सोशल मीडियावर#boycottchhapaak हा हॅशटॅग ट्रेंड केला जातआहे.
या प्रकरणावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश जावडेकर म्हणाले कि, हा लोकशाही देश आहे. देशातील कोणताही व्यक्ती, कलाकार कुठेही जाऊ शकतो. स्वत:चे विचार मांडू शकतो, असे जावडेकर यांनी सांगितले.
रविवारी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU)विद्यार्थी आणि शिक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यंना पाठिंबा देण्यासाठी देशभरात जोरदार निदर्शने चालू आहेत.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण मंगळवारी जेएनयूत गेल्या होत्या. दीपिकाच्या या भूमिकेमुळे एकीकडून तिला ट्रोल केले जात आहे तर एकीकडे तिच्या निर्णयाचे सोशल मीडियावर स्वागत करण्यात येत आहे.