शेकडो विद्यार्थी उतरले रस्त्यावर : सरकारविरोधी घोषणाबाजी
पुणे – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर झालेल्या हल्ल्याविरोधात शहरातील विविध महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी मंगळवारी रस्त्यावर उतरले. केंद्र सरकार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यादरम्यान मंगळवारी सांयकाळी मोर्चा काढण्यात आला. “जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत आम्ही उभे आहोत’ असा आशय असलेला मोठा कापडी फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींसह अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग होता. डफली, हलगी घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी वादन आणि घोषणाबाजी सुरू केली. यावेळी “सीएए’, “एनआरसी’ला विरोध करणाऱ्याही घोषणा विद्यार्थ्यांकडून दिल्या जात होत्या.
एफटीआयआयपासून सेनापती बापट रस्त्यावरून हा मोर्चा घोषणाबाजीने पुढे जात होता. विद्यार्थ्यांच्या हातात सामाजिक सलोखा, बंधुभाव याचे संदेश देणारे फलक, तिरंगा, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग याचे फोटोही होते. वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घेत चार ते पाच रांगांमध्ये विद्यार्थी विद्यापीठाच्या दिशेने पायी जात होते. जवळपास एक किलोमीटर लांब या मोर्चाची रांग असल्याने वाहनचालकही याकडे उत्सुकतेने पाहात होते. मोर्चाचा समारोप विद्यापीठाच्या रिफेक्टरी येथे झाला.
गरवारे महाविद्यालयात अभाविपचे आंदोलन
आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये डाव्या संघटनांच्या विरोधात “अभाविप’ कार्यकर्त्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. या वेळी महाविद्यालयातील कार्यकर्ते, विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सदाशिव पेठेतील “अभाविप’च्या कार्यालयावर जाऊन तेथील नामफलकास काळे फासले. हा प्रकार घडल्याचे कळताच “अभाविप’चे कार्यकर्ते व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, “आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहोत, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करून दहशत निर्माण करत आहेत. याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली जाणार आहे,’ असे महामंत्री अनिल ठोंबरे यांनी सांगितले. दरम्यान, काळे फासणाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्रत्येक कार्यालयाला काळे फासणार
“जेएनयूमध्ये अभाविपने तोंडाला मास्क लावून विद्यार्थ्यांवर हल्ले केले. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही “मास्क एबीव्हीपी’ ही मोहीम हातात घेतली आहे. राज्यातील अभाविपच्या सर्व कार्यालयांच्या नामफलकावर काळे फासले जाणार आहे,’ असे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस संघटनेकडून सांगण्यात आले.