Jammu And Kashmir | उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा येथे शनिवारी (1 नोव्हेंबर) दहशतवाद्यांनी 14 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर हल्ला केला. मात्र, जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. या हल्ल्याच्या काही वेळापूर्वी बडगाममध्ये दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांवर गोळीबार केला होता. यानंतर लष्कराने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी घेराव घालण्यास सुरुवात केली.
रात्री हल्ला करण्यात आला
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कराच्या 14 आरआरच्या कॅम्पवर रात्री 9.30 वाजता हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी काही अंतरावरून छावणीवर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी बाहेरच्या गेटवर तैनात असलेल्या संत्रीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने प्रत्युत्तर दिले. इतर सैनिकांनीही पोझिशन घेत प्रत्युत्तर दिले. यानंतर दहशतवादी तेथून पसार झाले.परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
बडगाममध्ये दहशतवाद्यांनी दोन लोकांना लक्ष्य केले
त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील दोघांना गोळ्या घातल्या. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मध्य काश्मीर जिल्ह्यातील मगममधील मजमा भागात झालेल्या गोळीबारात सुफियान आणि उस्मान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वखाली सरकार स्थापन झाल्यापासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा हा पाचवा हल्ला आहे.
यापूर्वी 24 ऑक्टोबर रोजी गुलमर्ग या पर्यटन स्थळापासून सहा किलोमीटर अंतरावर लष्कराच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन सैनिक आणि दोन कुली शहीद झाले होते, तर दुसरा कुली आणि एक सैनिक जखमी झाला होता. आदल्या दिवशी, पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील शुभम कुमार या मजुराला गोळ्या घालून जखमी केले होते. 20 ऑक्टोबर रोजी, दहशतवाद्यांनी गंदरबलच्या गगनगीर भागात एका बोगद्याच्या बांधकामाच्या ठिकाणी स्थानिक डॉक्टर आणि सहा गैर-स्थानिक मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. 18 ऑक्टोबर रोजी शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बिहारमधील एका मजुराची गोळ्या झाडून हत्या केली होती.