J&K Assembly Elections Phase 1: गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आज पहिल्या टप्प्यात एकूण 7 जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. जम्मू विभागातील 3 जिल्हे आणि काश्मीर खोऱ्यातील 4 जिल्ह्यांतील 24 जागांवर 90 अपक्षांसह एकूण 219 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.
ज्या मतदारसंघात आज मतदान होत आहे त्यात पंपोर, त्राल, पुलवामा, राजपोरा, जैनापोरा, शोपियान, डीएच पोरा, कुलगाम, देवसर, दोरू, कोकरनाग (एसटी), अनंतनाग पश्चिम, अनंतनाग, श्रीगुफ्वारा-बिजबेहारा, शांगस-अनंतनाग पूर्व, पहलगाम, इंदरवाल, किश्तवाड, पैडर-नागसेनी, भद्रवाह, डोडा, दोडा पश्चिम, रामबन आणि बनिहाल यांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी सायंकाळी 6 वाजता संपले. 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 58.19% होती. अंतिम आकडेवारी येणे बाकी आहे.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.१९ टक्के मतदान-
भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८.१९% मतदान झाले आहे
संध्याकाळी ५ वाजेपर्यंतचे मतदान –
अनंतनाग – 54.17 टक्के
दोडा – ६९.३३ टक्के
किश्तवाड – ७७.२३ टक्के
कुलगाम – ५९.६२ टक्के
पुलवामा – ४३.८७ टक्के
रामबन – ६७.७१ टक्के
शोपियान – 53.64 टक्के
90 जागांवर तीन टप्प्यात मतदान होणार आहे
जम्मू-काश्मीरच्या 90 विधानसभा जागांवर 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 च्या निवडणुकीत पीडीपीला सर्वाधिक 28 आणि भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले होते.