मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्याचे राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशात मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. शिवसेना भवनसमोर मनसेने लावलेले एक पोस्टर सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.ज्यावर राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आता या बॅनरबाजीबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत भाष्य केले आहे.
गुढी पाडव्यानिमित्त मनसेने शिवसेना भवन आणि दादर परिसरात प्रचंड बॅनरबाजी केली आहे. शिवसेना भवनासमोरील लावलेल्या पोस्टरमुळे राजकारण चांगलेच तापू लागले आहे.राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेल्या पोस्टरबाबत बोलताना राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. “राज ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर मी जनतेच्या मनातील पंतप्रधान आहे” अशी मिश्किल प्रतिक्रिया यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
“जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं जर त्यांना वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान आहे” असा टोला यावेळी आव्हाडांनी लगावला. आज मनसेचा गुढी पाडवा मेळावा होणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना भवन बाहेरील बॅनरवर नेमका काय लिहिलंय
शिवसेना भवनासमोर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री… हिंदूंचे लोकनेते राजसाहेब ठाकरे… हा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बॅनरवर भगवी शाल परिधान केलेला राज ठाकरेंचा फोटो देखील आहे. तसेच बॅनर लावणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याचा फोटो देखील बॅनरवर दिसत आहे.