मुंबई : नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण काल, सोमवारी हा पुतळा कोसळला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, ‘एरवी बोलणारे शांत आहेत,’ असे सांगत भाजपाच्या जवळ असलेल्या एका व्यक्तीवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी काल, सोमवारी, मूर्तीकार मूर्तीकार जयदीप आपटे याची एक मुलाखत सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पुतळ्याच्या अनावरणानंतर जयदीप आपटे याने ही मुलाखत दिली आहे. काही करायचे ते निवडणूक प्रचारासाठी हे या सरकारचे सुरूवातीपासूनचे धोरण आहे. परंतु आज त्यांच्या या धोरणाने महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला आहे, असे त्यांनी सुनावले आहे.
तर, आता पुन्हा याच मुद्द्यावर ट्वीट करत आमदार आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एरवी बोलणारे आज शांत आहेत. त्यांना सांगा मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.