मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता ठणठणीत असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून ते रूग्णालयात उपचार घेत होते. गुरूवारी अखेर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड २२ एप्रिल रोजी रात्री उशिराने ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आव्हाडांना अचानक ताप आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर २० दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या ऑफिस ट्विटरने यासंबंधी माहिती दिली असून वाघ येतोय…लवकरच…नव्या उर्जेसह, असे ट्विट करण्यात आले आहे. आव्हाड यांना डिस्चार्ज दिल्याचे कळल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, त्यांच्या हितचिंतकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
वाघ येतोय…लवकरच…नव्या उर्जेसह ❤️❤️#२४तास_जनतेसाठी pic.twitter.com/2dpdhMBIaS
— Office of Dr. Jitendra Awhad (@AwhadOffice) May 7, 2020
दरम्यान, कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात करोनाचा संसर्ग वाढत असताना आमदार जितेंद्र आव्हाड हे स्वत: नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसत होते. त्याच दरम्यान तेथील एका पोलीस कर्मचाऱ्याला करोना झाल्याची माहिती समोर आली. तसेच तसेच आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात जितेंद्र आव्हाड येत असल्याने त्यांची सुद्धा करोना टेस्ट करण्यात आली होती. त्यांचा या टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना आता अचानक ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जितेंद्र आव्हाड यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.