साहेबांच्या हृदयावरील जखम कार्यकर्त्यांनी भरून काढावी; मुंबईत आव्हाडांचे आवाहन

मुंबई – अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रीपद भूषवलेली नेते पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाली. त्यामुळे राष्ट्रवादीची ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी वाताहत होणार असं चित्र होतं. यामुळे शरद पवार स्वत: मैदानात उतरले होते. त्यानंतर चमत्कारिकरित्या राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आला. तर पक्ष सोडून जाणारे विरोधात बसले आहेत. आता विरोधात बसलेल्या नेत्यांना धडा शिकविण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हान यांनी हे आवाहन केले आहे.

मीरा भाईंदरचे नगरसेवक ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले त्याचवेळी मी, गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार असल्याचे ओळखले होते. शरद पवार यांना याबाबत कल्पना दिली होती, परंतु नाईक यांच्यावर पवार साहेबांचा प्रचंड विश्वास होता. काही काळातच नाईक यांनी राष्ट्रवादी सोडली. ही जखम पवार साहेबांच्या हृदयावर आजही आहे. ही जखम भरून काढण्याचे काम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. रविवारी, नवी मुंबई महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.

दुसऱ्याने केलेली कामे आपल्या नावावर कशी खपवायची हे जर शिकायचे असेल तर नाईकांकडे जाऊन शिका, असा टोला त्यांनी लगावला. प्रत्येक सभेला शरद पवार यांच्याशेजारी नाईक बसायचे, परंतु भाजपच्या पहिल्याच सभेत त्यांना खाली जागा मिळाली नाही. त्याचं वाईट वाटत असल्याचे सांगत त्यांच्यात स्वाभिमान उरलेला नसल्याची टीका त्यांनी केली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या चहू बाजू उघडून टाकल्याचे आव्हाड म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.