विविधा: जितेंद्र अभिषेकी

माधव विद्वांस

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी (नवाथे) यांची आज जयंती. त्यांचा जन्म 21 सप्टेंबर 1932 रोजी प्रियोळ (मंगेशी) येथे झाला. त्यांच्या घराण्यात मंगेशमंदिरातील पिंडीवर अभिषेक करण्याचे काम होते. त्यामुळे अभिषेकी हे नाव रूढ झाले. त्यांचे वडील भिकंभट तथा बाळूबुवा उत्तम कीर्तनकार होते. त्यांना आपल्या मुलाने चांगला गायक व्हावे अशी इच्छा होती.त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे वडिलांकडे घेतले. ते वडिलांना कीर्तनामध्ये साथ करीत असत. त्यांच्या वडिलांनी त्यांना संस्कृतही शिकविले होते. 1949 मध्ये ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर म्हापसा येथे दोन वर्षं पोर्तुगीज कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. मराठी, कोंकणी, पोर्तुगीज, इंग्रजी आदी भाषा त्यांना अवगत होत्या.

बांदिवड्याच्या गिरिजाबाई केळेकर या त्यांच्या संगीतातील पहिल्या गुरू. त्यांच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार ते पुणे येथे गायन शिक्षणासाठी आले. पुण्यात आल्यावर अनाथाश्रमात राहून, वार लावून जेवून, माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी एकूण 21 गुरुंचेकडून वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतले व स्वतःची वेगळी संगीत शैली निर्माण केली. पुण्यात नरहरबुवा पाटणकर व यशवंतराव मराठे यांच्याकडे ते गाणे शिकले.तेथून ते बेळगावला गेले व तेथे पेटीवादक विठ्ठलराव कोरगावकरांकडून त्यांनी संगीताचे काही धडे घेतले. पुढे भवन्स कॉलेज, वर्ष 1952 मधे मुंबई येथून संस्कृत विषय घेऊन ते बी. ए. झाले. त्यानंतर मुंबई आकाशवाणी केंद्रात कोंकणी विभागात संगीत संयोजक म्हणून ते रूजू झाले.

नोकरी करीत असतानाच उस्ताद अझमत हुसेन खॉंसाहेब यांच्याकडून गायनाचे मार्गदर्शन घेण्याची संधी त्यांना मिळाली. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. याबरोबरच अभिषेकी यांना निवृत्तीबुवा सरनाईक, रत्नाकर पै, अझिझुद्दीन खॉं, मास्टर नवरंग, केसरबाई बांदोडकर, गुलुभाई जसदनवालां इत्यादींकडून मार्गदर्शन मिळाले व त्यामुळे त्यांची गायकी अधिक समृद्ध झाली. त्यांनी जास्त करून भजन, अभंग व नाट्यगीते गायली. संत चोखामेळा यांचे अबीर गुलाल उधळीत हे भक्‍तिगीत संगीतबद्ध करून भूप रागात स्वतः गायले.

कट्यार काळजात घुसली या नाटकातील “घेई छंद मकरंद’ हे पुरषोत्तम दारव्हेकरांचे गीत धनी रागामधे पंडित वसंतराव देशपांडे, स्वतः जितेंद्र अभिषेक व प्रसाद सावकार यांनी गायले आहे. त्याचे संगीतही अभिषेकी यांचेच होते. संत तुकाराम यांचा “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ हा अभंग संगीतबद्ध करून त्यांनी स्वतः गायला.

आकाशवाणीसाठी केलेल्या “बिल्हण’ या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले “गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे गीतही त्यांनी गायले व रसिकांना खूप आवडले. त्यांच्या संगीत दिग्दर्शनात ते नवीन प्रयोग करायचे.

कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. लेकुरे उदंड झाली या नाटकात रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्‍स वापरले आणि मुक्‍तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान मिळाले त्यापैकी प्रमुख म्हणजे नाट्यदर्पण (1978) पद्मश्री (1988)संगीत नाटक अकादमी (1989) महाराष्ट्र गौरव पुरस्कार (1990) बालगंधर्व पुरस्कार (1995) यांचा समावेश आहे.

त्यांचे चिरंजीव शौनक अभिषेकी त्यांचा वारसा पुढे चालवीत आहेत. त्यांनी आपणासी ठावे ते इतरांसि द्यावे या समर्थांच्या उक्‍तीप्रमाणे गुरुकुल पद्धतीने अनेक शिष्यगण तयार केले. त्यापैकी शौनक अभिषेकी, देवकी पंडित, राजा काळे, प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, हेमंत पेंडसे, शुभा मुद्‌गल, महेश काळे हे सध्याचे आघाडीचे गायक आहेत. 7 नोव्हेंबर 1998 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना अभिवादन.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here