पुणे – जिल्ह्यात करोना बाधितांमध्ये वाढ होत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गर्दी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्यासंदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह दोन्ही महापौरांशी चर्चा करून प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
विधानभवन येथे पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह ग्रामीण भागातील करोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा व साधन सामग्री उपलब्ध असल्याची खात्री जिल्हा शल्यचिकित्सक यांनी करावी. या भागातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना गृह विलगीकरण करण्यात येणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे.
गृहविलगिकरण केलेल्या रुग्णांना दुरध्वनीव्दारे संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांची माहिती अद्यावत ठेवावी. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील व खासगी प्रयोगशाळांमध्ये आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची माहिती अद्ययावत ठेवावी.’
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातील करोना परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्ण, अति जोखीम व कमी जोखीम नागरिक, करोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या तसेच रुग्णदर व मृत्युदराबाबत माहिती देऊन ऑक्सिजन पुरवठा नियोजन व बेडची उपलब्धता तसेच उपाययोजनांची माहिती दिली.