मुंबई – एक मुलगा आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालत असताना त्या लहानग्याचा तोल गेला आणि तो मुलगा ट्रॅकवर पडला. त्या मुलाची अंध आई चाचपडत होती. त्याच वेळेला एक मेल-एक्सप्रेस त्या मुलाच्या दिशेने आली त्यावेळी जीवाची पर्वा न करता मयुर शेळके याने रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या चिमुकल्याचा जीव वाचवला होता.
या घटनेनंतर काही तासातच या घटनेचा व्हिडियो सोशलवर तुफान व्हायरल झाला. वांगणी रेल्वे स्थानकात झालेल्या या घटनेच्या व्हिडियोची दखल रेल्वे मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वानी घेत मयूर शेळकेचे कौतुक केले तसेच त्याला रेल्वेकडून त्याला पन्नास हजार रुपयांचं विशेष बक्षीस जाहीर करण्यात आलं. लवकरच ही रक्कम त्याला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याने बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. याशिवाय जावा कंपनीनेही मयुर शेळकेला बाईक भेट देण्याची घोषणा केली आहे. बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतल्यामुळे पुन्हा एकदा मयूर शेळकेच्या या निर्णयाचे सोशलवर कौतुक होत आहे. शौर्य गाजवून मनं जिंकणारा मयुर आपल्या ठायी असलेल्या दातृत्व गुणाचंही दर्शन घडवत आहे.