रेडा-एक करारी महिला, राष्ट्र प्रेमाने प्रेरित झालेली महिला म्हणून तसेच स्वराज्याला नेतृत्व देण्याची महत्वकांक्षा मनामध्ये बाळगून राजमाता जिजाऊंनी आपले कार्य सुरू ठेवले, असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
शिवभक्त परिवार इंदापूर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथे स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन केले होते. यावेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले, जीवनात सुख-दुःख येतील; परंतु ज्या ज्या वेळेला आपल्याला अडचणी येतील तेव्हा राजमातेचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा, सगळ्या संकटावर मात करण्याची ताकद राजमातेच्या चेहऱ्यावर आहे. भारताच्या कल्याणासाठी आणि जनतेच्या उद्धारासाठी स्वामी विवेकानंदांनी आपले कार्य केले. शिकागोतील त्यांचे भाषण राष्ट्र प्रेमाचे प्रतीक आहे अशीही माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
अमर शहीद जवान प्रदीपकुमार उमाकांत शेटे (गोतोंडी) यांच्या वीरपत्नी श्रीमती पुष्पलता प्रदीपकुमार शेटे यांना या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले आणि नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. वीरपत्नी सुरेखाताई जाधव, कस्तुराबाई धोंडीबा मस्के यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला तसेच आजी-माजी सैनिकांच्या माता व पत्नी यांना साडी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार येसाजी कंक यांची दिव्य तलवार सर्व शिवप्रेमींना दर्शनासाठी उपलब्ध केली होती.
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल राजवर्धन पाटील तसेच सुवर्णपदक विजेते पृथ्वीराज नलवडे, हर्षदा बारवकर, प्रा. दत्ता रास्ते आणि गलांडवाडी नंबर एक लेझीम पथक, साताऱ्याचे तुतारी वादक गुरवबंधू, बावड्याचे जय भवानी हलगी वादक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, नगराध्यक्षा अंकिता शहा, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, राजवर्धन पाटील, खजिनदार मनोहर चौधरी, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, मंगेश पाटील, सभापती पुष्पाताई रेडके, सुरेश मेहेर, मनोज जगदाळे, शेखर पाटील, दीपक जाधव, महेंद्र रेडके, बाळासाहेब मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार फलफले यांनी केले. बापू जामदार यांनी आभार मानले.