जिजामाता उद्यानाचे काम रखडले

ऐन उन्हाळ्यात कुलूप ः मुदत उलटून दोन वर्षे झाल्यानंतरही काम अपूर्ण

पिंपरी  –
पिंपळे गुरव मधील डायनोसॉर उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता उद्यानाच्या नुतनीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. मात्र, मुदत संपून दोन वर्षे उलटूनही काम अपुर्णावस्थेत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उद्यान बंद आहे. परिणामी ऐन सुट्टीच्या हंगामातील महापालिकेचा लाखोंचा महसूल बुडत असून बालचमूंचाही हिरमोड झाला आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. नोकरदार आई-बाबांमुळे बालचमूंसाठी उद्याने विरंगुळा ठरत आहेत. नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरासाठी जिजामाता उद्यान हे एकमेव उद्यान आहे. मात्र, मागील अडीच वर्षांपासून उद्यानाचे काम सुरू आहे. वास्तविकतः पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2006 मध्ये दोन कोटी रुपये खर्च करून हे उद्यान उभारण्यात आले. जॉगिंग ट्रॅक, दाट झाडी, आकर्षक कारंजे व विस्तीर्ण परिसरात डायनोसॉरची प्रतिकृती हे या उद्यानाचे आकर्षण होते. मात्र, 2015 मध्ये या उद्यानाच्या नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. दुबईतील मिरॅकल उद्यानाच्या धर्तीवर नुतनीकरणांतर्गत सुशोभिकरण करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार, महापालिकेने या नुतनीकरणासाठी 4 कोटी 20 लाख रुपयांची
तरतूद केली.

2016 मध्ये प्रत्यक्षात नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. एम. एस. साठे यांची कंत्राटदार म्हणून या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे. वर्षभराची मुदत या कामासाठी होती; मात्र अडीच वर्षे उलटूनही काम अर्धवट स्थितीमध्ये आहे. राजकीय वादंगातून नुतनीकरणाच्या कामात अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे एकीकडे काम पूर्ण करण्यास विलंब होत असतानाच दुसरीकडे कामावरील खर्चाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहे. या संपूर्ण कामासाठी सुरुवातीला साडेचार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती; मात्र टप्पा एक व दोन असा शब्दखेळ करत दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी पाच कोटींच्या वाढीव खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे काम आता दहा कोटींच्या घरात पोहचले आहे.

एकीकडे उद्यानाच्या कामावर वाढीव खर्चाचा रतीब सुरु असताना दुसरीकडे उद्यानाचे काम अर्धवट स्थितीमध्ये आहे. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे उद्यान विभागासाठी सुगीचा काळ असतो. जिजामाता उद्यानात प्रवेशासाठी महापालिकेकडून शूल्क घेतले जाते. मात्र, ऐन हंगामात उद्यान बंद असल्याने उद्यान विभागाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. सकाळी व सायंकाळी उद्यानात फेरफटका मारणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. स्थानिक नेत्यांनी राजकारण बाजूला सारुन उद्यानाच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जिजामाता उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी अठरा महिन्यांची निविदा होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात उद्यानाचे काम सुरू झाले. मात्र, मुदत संपूनही दोन वर्षे झाली तरी काम अपूर्ण आहे. सत्ताधारी भाजपने तरतूद वाढवून घेतली. उद्यानाच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचबरोबर सत्ताधारी देखील पाठपुरावा करण्यात कमी पडले आहेत. त्याचा भूर्दंड करदात्यांना सोसावा लागत आहे.

– राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.