बैरुत – सीरियातील हजारो जिहादी बंडखोरांनी अलेप्पो शहरात प्रवेश मिळवला आहे. त्यांनी अत्याधुनिक शस्त्रे आणि चिलखती वाहने देखील मिळवली आहेत. सरकारी फोजांकडून फारशी मदत मिळू न शकल्यामुळे दिवसभरातच बंडखोरांनी अलेप्पो शहरात प्रवेश केला आहे.
हयात तहरीर अल-शाम या संघटनेच्या जिहादी बंडखोरांशी संबंधित ठिकाणांवर दोन हवाई हल्ले केले गेले आणि जवळच्या रहिवाशी भागावर मारा केला गेला, असे काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले. या हल्ल्यामध्ये २० बंडखोर मारले गेल्याचेही निरीक्षकांनी म्हटले आहे.
अलेप्पो शहर बंडखोरांपासून वाचवण्यासाठी आणि प्रत्युत्तरासाठी सैन्य पुन्हा तैनात केले जात असल्याचे सीरियाच्या सशस्त्र दलांनी म्हटले आहे. अलेप्पो शहराच्या काही भागात बंडखोरांनी प्रवेश मिळवल्याच्या वृत्ताला सरकारी फौजांनी दुजोरा दिला आहे.
या बंडखोरांनी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असाद यांची पोस्टर देखील फाडून टाकली आहेत. बंडखोरांकडून अचानक झालेला हा हल्ला असाद यांच्यासाठी एक धक्का मानला जातो आहे.
इसिसच्या दहशतवाद्याना रशियाच्या पाठिंब्याने सीरियाच्या फौजांनी सीरियातल्या बहुतेक भागातून हुसकावून लावल्यानंतर २०१६ मध्ये असाद यांनी देशाच्या बहुतेक भागावर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात जिहादींच्या कारवाया सुरू होत्या, मात्र अलेप्पो शहरावर इतक्या मोठ्या प्रमाणावर जिहादींचा हल्ला झाला नव्हता.
सीरियातल्या बंडखोरांना तुर्कीयेचा पाठिंबा
सीरियातल्या जिहादी बंडखोरांना तुर्कीयेचा पाठिंबा आहे. सीरिया सरकारकडून होत असलेले हल्ले रोखण्यासाठी मुत्सदेगिरीच्या प्रयत्नांत तुर्कीयेला अपयश आले. रशिया, तुर्कीये आणि इराणच्या मध्यस्थीने २०१९ मध्ये झालेल्या कराराचा भंग करून सीरिया सरकारने जिहादींवर हल्ले केल्याचा आरोप तुर्कीयेकडून केला जातो आहे.
लेबेनॉनमधील इराणशी संबंधित हिज्बुल्लाहने २०१५ पासून सीरियातल्या सरकारी सैन्याला पाठिंबा दिला आहे. मा६ सध्या हिज्बुल्लाह इस्रायलविरुद्ध लेबेनॉनमध्येच सुरू असलेल्या संघर्षात गुतली आहे. हिज्बुल्लाहने इस्रायलशी युद्धविराम केल्यादिवसापासूनच सीरियातील बंडखोरांनी आक्रमण सुरू केले आहे.