JICA Project Pune – मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून जायका प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्यापोटी आणखी २४ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी महापालिकेस वितरित करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून नुकतेच याबाबत आदेश काढण्यात आले आहे. या योजनेत शहरात नदीकाठावर ११ ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार आहेत. तसेच, शहरातील नाले तसेच नदीमध्ये येणारे पाणी थेट संकलित करून त्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले जाणार आहे.केंद्र शासनाने या कामासाठी ९९० कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे. तर यात ८५ टक्के निधी (८४१ कोटी) रुपये केंद्रशासन देणार आहे. तर उर्वरित १५ टक्के ( १४८ कोटी) महापालिकेकडून खर्च केला जाणार आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत केंद्र शासनाकडून ६२१ कोटींचा निधी महापालिकेस राज्य शासनाच्या मार्फत देण्यात आला आहे. मुळा मुठा नदी तर या योजनेचे काम अंतिम टप्प्यात २६ जानेवारीपासून या योजनेतील तीन सांडपाणी शुद्धीकरण केंद्र सुरू केली जाणार असून उर्वरित सात केंद्र डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तर यातील एका केंद्रासाठी महापालिकेस आवश्यक असलेली औंध येथील बाॅटनिकल गार्डनची जागा महापालिकेस अद्यापही मिळालेली नसल्याने या सांडपाणी शुद्धीकरण केंद्राचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. केंद्राकडून दरवर्षी या योजनेतील निधीचे वितरण शासनाकडे केले जात असले तरी शासनाकडून ते वेळेत मिळत नाही. त्यामुळे महापालिकेस वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे. तसेच हे पैसे मिळेपर्यंत पदरमोड करून ठेकेदारांची बिले देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अशा स्थितीत हा मिळालेला निधी महापालिकेसाठी दिलासा देणारा ठरला आहे.