मुंबई – नुकतच ‘झलक दिखलाजा’ च्या सीझन 10 चा प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला. चित्रपट निर्माता करण जोहर, अभिनेत्री माधुरी दीक्षित,अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही या शोमध्ये जज म्हणून दिसल्या होत्या. त्याचवेळी हा शो भारती सिंग होस्ट करताना दिसली. शोच्या प्रोमो व्हिडिओने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली होती. मिळालेल्या माहितीनुसार हा शो सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे.
मराठी कलाकारांचा बोलबाला
‘झलक दिखला जा 10’मध्ये बऱ्याच दिवसांनी अभिनेत्री शिल्पा शिंदे दिसणार आहे. शिल्पा लोकप्रिय टीव्ही शो ‘भाभीजी घर पर हैं’ मधील अंगूरी भाभीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. याशिवाय ती सलमान खानच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 11′ ची विजेती आहे.शिल्पाची एंट्री निश्चित मनाली जात आहे. मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्री अमृता खानविलकर देखील “झलक दिखला जा 10” मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. तिला डान्सची प्रचंड आवड आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या चंद्रमुखी चित्रपटातील तिची लावणी चांगलीच गाजली होती.
“अनुपमा’ शो फेम पारस कलनावतनेही “झलक दिखला जा 10’मध्ये थिरकणार आहे. मीडियाशी बोलताना तो म्हणाला, “मी झलक दिखला जा 10 मधून माझा प्रवास सुरू करणार आहे. मी खरोखरच खूप आनंदी आहे. हे करण्यात आनंदी आणि उत्साही आहे, कारण मला आयुष्यात नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
रोहित शेट्टीच्या 2020 मध्ये ‘खतरों के खिलाडी’ आणि फ्लिपकार्टच्या शो ‘लेडीज व्हर्सेस जेंटलमेन’मध्ये दिसलेली निया शर्मा आता ‘झलक दिखला जा 10’ मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. त्यासोबतच ‘इश्कबाज’ फेम टीव्ही अभिनेत्री निती टेलरही या स्पर्धेत आपले नजीब आजमावणार आहे. टीव्ही कलाकार धीरज धूपर आणि मराठी अभिनेता गश्मीर महाजनी यांनाही या कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आले असल्याचे वृत्त समोर आले आहे.