मुंबई – कुलाबा येथील ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केल्याने मराठी लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर २० तासांपासून ठिय्या आंदोलन करत आहे. यानंतर सकाळी आंदोलनस्थळी आलेले मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला मनसे स्टाईल दणका दिला.
दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागातील ‘महावीर ज्वेलर्स’ या ठिकाणी शोभा देशपांडे गुरुवारी दुपारी गेल्या होत्या. यावेळी दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीतून बोलत होते. त्यांनी मराठीतून बोलावे, अशी विनंती शोभा यांनी केली. मात्र त्यांनी मराठीत बोलण्यास नकार तर दिलाच शिवाय दागिने देण्यासही नकार दिला. तसेच पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिल्याचा आरोपही शोभा देशपांडे यांनी केला आहे.
दुकानदार आणि पोलिसांनी दुकानाबाहेर काढल्यावरुन देशपांडे काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून दुकानासमोर ठाण मांडून बसल्या आहेत. पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जोपर्यंत येत नाहीत आणि ज्वेलर्स दुकानदाराने आपल्यासह मराठी भाषेचाही अपमान केला आहे. त्यामुळे ज्वेलर्स दुकानदारावर जोवर कारवाई होत नाही तोपर्यंत न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. यानंतर सकाळी संदीप देशपांडे यांनी मनसे स्टाईल चोप दिला. यानंतर दुकानदाराने शोभा देशपांडे यांची माफी लागितली.
कोण आहेत शोभा देशपांडे?
शोभा देशपांडे या लेखिका आहेत. मराठी भाषेवर त्यांचे अतोनात प्रेम असून त्या मराठीचा नेहमी आग्रह धरत असतात. शोभा देशपांडे यांनी थरारक सत्य इतिहास आणि इंग्रजी इंडिया हाच आपला खरा शत्रू या दोन पुस्तकांचं संकलन केलं आहे. त्या एक वृत्तपत्रही चालवत होत्या. त्यांचे पती भारतीय नौदलात होते. शोभा देशपांडे या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेसाठी लढा देत आहेत.