टवाळखोर मुलांच्या प्रतापामुळे शिक्षक हैराण : विद्यार्थीच ट्रोलर्सना देतात आमंत्रण
पिंपरी – सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षणाकडे आपला मोर्चा वळविला आहे. मात्र सध्या या शिक्षणात टवाळखोर मुलांमुळे जेठालाल, दिपिका व अन्य नावाने घुसखोरी होत आहे. यामुळे शिक्षण हैराण झाले असून मुलांना शिकवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
शहरातील एका नामांकित शाळेचे वर्ग ऑनलाइन होत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन शिक्षणाच्या या तासाला जेठालाल, दीपिका आणि अन्य नावाने घुसखोरी होत आहे. हे घुसखोर शिकवणी सुरू असताना काहीही वात्रट बोलून शिक्षक व विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करतात. यामुळे मुलांना शिकवायचे तरी कसे, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
‘ट्रोल माय क्लास’
याबाबत माहिती घेतली असता वर्गातील काही खोडखोर विद्यार्थी शाळेच्या ऑनलाइन शिकवणीची लिंक सोशल मीडियावर फिरवतात. सोशल मीडियावर ट्रोल या नावाने काही ऍप असून ज्यांना त्रास द्यायचा आहे, ती लिंक त्या ग्रुपवर शेअर करून “ट्रोल माय क्लास’ असे लिहतात. यामुळे काही ट्रोलर्स शाळेच्या ऑनलाइन क्लासेसमध्ये घुसखोरी करून व्यत्यय आणत आहेत. अशा मुलांना वठणीवर आणण्यासाठी आपण सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्याचे शिक्षकांनी मुलांना सांगितले.
तक्रार आल्यास कारवाई करू
शाळेमधील घुसखोराबाबत सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांना विचारले असता ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात असा प्रकार घडल्याची तक्रार सायबर विभागाकडे प्राप्त झालेली नाही. मात्र पुणे शहरात असा काही प्रकार घडल्याने याबाबत तक्रार दाखल झाली होती. आमच्याकडे तक्रार आल्यास आम्ही देखील संबंधितास शोधून काढून योग्य ती कारवाई करू.