जेट एअरवेजच्या अडचणी वाढल्या

123 पैकी केवळ 13 विमाने सेवेत कार्यरत

नवी दिल्ली -केंद्र सरकार आणि जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या बॅंका या कंपनीच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्या तरी जेट एअरवेजच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. एक वेळ ही कंपनी देश-विदेशात 123 विमानांचा ताफा बाळगून होती. मात्र, आता कंपनीची केवळ 13 विमाने कार्यरत असल्याचे बोलले जाते.

पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणात लक्ष घातले असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या प्रकरणावर चर्चा करीत असल्याचे बोलले जाते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विमानसेवा देण्यासाठी एखाद्या कंपनीकडे किमान वीस विमाने असावी लागतात. मात्र जेटकडील विमानांची संख्या 20 पेक्षा कमी झाल्यामुळे जेटला आंतरराष्ट्रीय सेवा रद्द कराव्या लागल्या आहेत. कंपनीची अनेक विमाने लीज रक्कम दिल्यामुळे सेवेत नाहीत. त्याचबरोबर काही विमाने लीज देणाऱ्यांनी ताब्यात घेतल्यामुळे कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत.

गेल्या आठवड्यात कंपनीच्या विमानाला इंधनपुरवठा करणाऱ्या तेल कंपन्यांनी काही काळ इंधनाचा पुरवठा बंद केला होता. त्यामुळेही कंपनीचे वेळापत्रक कोलमडले आहे. दुसरीकडे बॅंकांनी भागभांडवल विकण्यासाठी बोली प्रक्रिया सुरू केली असली तरी यासाठी इच्छुकांनी फारसा उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य झपाट्याने कमी होऊ लागले आहे. कंपनी अडचणीत आली असताना या अगोदरच उपाययोजना करण्याची गरज होती, असे आता विश्‍लेषकांनी सांगायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, जेटची विमाने कार्यरत नसल्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भारतातील विमान प्रवास महाग झाला आहे. त्यामुळे इतर कंपन्या नवी विमाने सेवेत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर नागरी विमान वाहतूक संचलनालयही इतर कंपन्यांना विमानांची संख्या वाढविण्यास सांगत आहे. मात्र, याला बराच वेळ लागत असल्यामुळे सध्या तरी प्रवाशांना मोठ्या प्रमाणात विमान भाडे द्यावे लागत आहे.

या आठवड्यात जर जेट एअरवेजचा प्रश्‍न सोडविण्यात जेट एअरवेज कंपनी, बॅंका आणि केंद्र सरकारला अपयश आले तर ही विमान कंपनी बंद पडते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. तसे झाले तर नागरी विमान वाहतूक क्षेत्रात बरीच अस्वस्थता पसरणार आहे.कारण त्यामुळे हजारो कर्मचारी आणि वैमानिक बेकार होऊ शकतात. भांडवलाच्या अभावांमुळे कंपनीची बरीच कमी विमाने आता कार्यरत नाहीत. या कंपनीला कर्ज देणाऱ्या बॅंकांनी या कंपनीचे सर्व भागभांडवल विकायला काढले आहे. त्यामुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालय आता सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.