मुंबई – भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रात एक नवा विक्रम लवकरच होणार आहे. जेट एअरवेजच्या नव्या सेवेची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली असून लवकरच या कंपनीची विमान सेवा व्यावसायिक पातळीवर सुरू होणार आहे.
भारतात आतापर्यंत एकही बंद पडलेली नागरी विमान वाहतूक कंपनी पुन्हा यशस्वीरित्या सुरू झालेली नाही. मात्र हा विक्रम जेट एअरवेज लवकरच करणार आहे.
27 एप्रिल रोजी जेट एअरवेजचे प्रायोगिक पातळीवरील उड्डाण हैदराबाद ते नवी दिल्लीदरम्यान उडाले. जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कपूर यांनी ही माहिती अभिमानाने माध्यमांना जारी केली आहे. या विमान कंपनीला खेळत्या भांडवलाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे 2016 नंतर विमान कंपनीसमोर अनेक अडचणी आल्या होत्या. शेवटी या विमान कंपनीची उड्डाणे बंद झाली होती.जेटने आपली काही विमाने इतर विमान कंपन्यांना वापरासाठी दिली होती.
आता ती विमाने परत घेण्याची प्रक्रिया चालू असून या विमानाची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली आहे. पाच चाचण्या केल्यानंतर नागरी विमान वाहतूक संचनालय संबंधित विमान कंपनीला व्यवसायिक वाहने सुरू करण्याची परवानगी देणे अपेक्षित असते. कधीकधी प्रायोगिक उड्डाणे यशस्वी झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत संचनालय या विमान कंपन्यांना व्यवसाय सेवा सुरू करण्यासाठी परवानगी देत असते.
मात्र जरी परवानगी दिली तरी या विमान कंपनीला आपले पूर्वीचे स्लॉटस् मिळण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. सध्याची एकूण परिस्थिती पाहता या परवानग्या लवकरच मिळण्याची शक्यता असून काही महिन्यात ही विमानसेवा पुन्हा नव्या दमाने सुरू होईल असे वातावरण आहे.