जेट एअरवेज कंपनीला घरघर

कंपनी मर्यादित काळासाठी बंद होण्याची शक्‍यता वाढली

नवी दिल्ली – अनेक अडचणीचा सामना करणारी जेट एअरवेज कंपनी मर्यादित काळासाठी बंद ठेवली जाण्याची शक्‍यता गुंतवणूकदाराच्या वर्तुळात व्यक्त केली जात होती. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून पिछाडीवर असलेल्या या कंपनीच्या शेअरच्या भावात मंगळवारीही जवळजवळ आठ टक्‍क्‍यांची घट झाली.

मुंबई शेअरबाजाराने कंपनीला ही कंपनी मर्यादित काळासाठी बंद केली जाणार आहे का याबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या या कंपनीच्या शेअरचे मूल्य बरेच कमी झाले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक दुबे यांनी सांगितले की, कंपनी बॅंका आणि सरकारबरोबर चर्चा करीत असून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कंपनीला लवकरच भांडवल मिळण्याची शक्‍यता असल्याचे बॅंकिंग वर्तुळातून पुन्हा सूचित करण्यात आले. असा प्रकार या अगोदर अनेक वेळा झालेला आहे. मात्र, या कंपनीच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी जेटला आणखी 1500 कोटी रुपये कर्ज देण्याची योजना होती. पण काल बॅंकांनी कर्ज देण्यास नकार दिला होता. त्यामुळे निधीअभावी जेट एअरवेज बंद होऊ शकते. जेट एअरवेज सुरू ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधनासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्‍न आहे.

जेटचे संस्थापक नरेश गोयल यांनी सुद्धा जेटमधील हिस्सा विकत घेण्यावरून माघार घेतली आहे. खेळते भांडवल नसल्यामुळे त्रस्त झालेल्या जेट एअरवेजची केवळ अर्धा डझन विमाने सध्या कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांनी पगारासाठी आंदोलन सुरू केले होते मात्र ते काही काळ परत घेतले आहे. कंपनीने विमानाचे भाडे न दिल्यामुळे 123 पैकी केवळ सहा ते आठ विमाने सध्या कार्यरत आहेत.

त्याचबरोबर या विमानांचा अनेक वेळा तेल कंपन्यांनी इंधन पुरवठा बंद केलेला आहे. तर दुसरीकडे स्टेट बॅंकेने या कंपनीचे भागभांडवल नव्या गुंतवणूकदारांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या प्रक्रियेला बराच वेळ लागत असल्यामुळे जेट रेल्वेच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात या बाबीची गंभीर दखल घेतली असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.