स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
नगर – खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्याला पुढील चौकशीसाठी कर्जत पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. अशोक संताराम फुलमाळी (वय-45 रा.भातकुडगांव ता. शेवगाव) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, अनैतिक संबंधातून मुलगी वेळोवेळी पैसे मागते म्हणुन तीच्यापासून सुटका होण्यासाठी आरोपी अशोक फुलमाळी याने इतर आरोपींशी संगणमत करून तीला शेतात घेऊन जाऊन तीचा गळा दाबून खून केला व तीचे प्रेत उसाचे शेतात टाकून पुरावा नष्ट केला होता. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे इतर गुन्हाचा समांतर तपास करत असतांना त्यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहिती नुसार आण्णा पवार, रवींद्र कर्डीले, संतोष लोढे, जालींदर माने, सचिन कोळेकर यांच्या पथकाने आरोपी अशोक संताराम फुलमाळी हा भातकुडगांव गांवात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचुन आरोपी यास ढोरजळगांव ते भातकुडगांव रोडला पाठलाग करुन पकडले. पुढील तपासकामी कर्जत पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.