नवी दिल्ली – कोरोना संकटाच्या काळामध्ये देशात जेईई व नीट परीक्षा घ्यायला हव्यात की नको यावरून राजकारण आता चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. गांधी यांनी हा व्हिडीओमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांना उद्देशून भाष्यं केलं आहे.
यामध्ये गांधी यांनी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत निर्णय घेताना, तो त्यांना विचारात घेऊनच घ्यायला हवा, असा सल्ला देखील सरकारला दिला आहे.
Students are our future, we depend on them to build a better India, therefore, if any decision has to be taken regarding their future it is important that it is taken with their concurrence.: Congress President Smt. Sonia Gandhi #SpeakUpForStudentSafety pic.twitter.com/Jf18cmykbd
— Congress (@INCIndia) August 28, 2020
सोनिया गांधी म्हणतात, “माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, मला तुमच्या परिस्थितीबाबत वाईट वाटतं. तुम्ही सध्या एका कठीण परिस्थितीला तोंड देत आहात. तुमची परीक्षा केव्हा, कुठं आणि कशी होईल? ही बाब केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या परिवारासाठी देखील महत्वाची आहे. तुम्ही आमचे भविष्य आहात. एका चांगल्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत. अशावेळी तुमच्या भविष्याशी निगडीत कोणता निर्णय घ्यायचा असेल, तर हे महत्वाचे आहे की तुम्हाला विचारात घेऊनच तो घ्यायला हवा. मला अपेक्षा आहे की सरकार तुमचे म्हणने ऐकेल, तुमचा आवाज ऐकेल व तुमच्या इच्छेनुसार काम करेल. हाच माझा सरकारला सल्ला आहे. जय हिंद”
तत्पूर्वी, १७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. यानंतर महाराष्ट्रासह सहा राज्यांतर्फे नीट आणि जेईई परीक्षेवर स्थगिती आणली जावी यासाठी सर्वोच्च न्यायालयत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.