पुणे – देशातील आयआयटी, एनआयटी अशा नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पातळीवर जेईई मेन्स ही प्रवेश परीक्षा आता चार टप्प्यात घेण्यात येणार आहे. दरवर्षी वर्षातून दोनवेळा होणारी परीक्षा आता विद्यार्थ्यांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यांत कधीही देता येणार आहे. करोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकात बदल झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
वर्षातील पहिली जेईई मेन्स परीक्षा फेब्रुवारी 2021 मध्ये 22 ते 25 फेब्रुवारीदरम्यान होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) स्पष्ट केले. यासाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारपासून सुरू झाली आहे.
करोनामुळे इयत्ता बारावी परीक्षांचे वेळापत्रक पुढे गेले आहे. त्यातच देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या कालावधीत या परीक्षा होणार असल्याने “जेईई मेन्स’ परीक्षेच्या आयोजनात अडचणी येत होत्या. त्यामुळे यावर तोडगा म्हणून “एनटीए’ने चार टप्प्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांना एक किंवा एकपेक्षा जास्तवेळा परीक्षा देण्याचा पर्याय खुला आहे.
“एनटीए’ने मंगळवारी जेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. महाराष्ट्रात 27, तर देशात 329 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. तर अभ्यासक्रमातही कपात केली असून, प्रत्येक विषयांचे 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. मराठीसह 12 भाषेत परीक्षा होणार आहे, असे “एनटीए’ने स्पष्ट केले आहे.
परीक्षेचे वेळापत्रक
अर्ज भरण्याची मुदत – 15 डिसेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021
शुल्क भरण्याची अंतिम मुदत – 16 जानेवारी 2021
अर्जात दुरुस्ती – 18 जानेवारी ते 21 जानेवारी 2021
प्रवेशपत्र उपलब्ध – फेब्रुवारीचा पहिला आठवडा
जेईई मेन्स परीक्षा – 22 ते 25 फेब्रुवारी 2021