“जेईई’ मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

देशातील 17 विद्यार्थ्यांनी मिळविले 100 टक्‍के गुण

पुणे – आयआयटी, एनआयटी, नामवंत अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात देशातील 17 विद्यार्थ्यांनी 100 टक्‍के गुण मिळविले आहेत. राज्यातील हर्ष वोरा हा विद्यार्थी महाराष्ट्रातून अव्वल आला आहे.

एप्रिल महिन्यात होणारी जेईई मेन परीक्षा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलण्यात आली. यानंतर तिसऱ्या सत्रात जेईई मुख्य परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली. त्याच वेळी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा 3 आणि 4 ऑगस्टला पार पडली.

या परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून 7 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 915 केंद्रावर आणि देशातील 334 शहरात ही परीक्षा घेण्यात आली. यातील 12 शहरे ही परदेशात आहेत.

पहिल्या 17 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा एकही विद्यार्थी नाही. मात्र महाराष्ट्रातील हर्ष वोरा याने 99.99 टक्के मिळवित देशात 28 वे स्थान मिळविले आहे. उत्तर प्रदेशात मुलींमध्ये पल अग्रवाल हिने देशात प्रथम तर चार विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 टक्के मिळवले आहेत.

पुण्यातील विद्यार्थ्यांचे यश
शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी 99.96 ते 98.06 टक्केपर्यंत मिळवित जेईई मुख्य परीक्षेत यश मिळविले आहे. पुण्यातून वेदांत अग्रवाल याने 99.96 टक्के, श्रेयस होनराव याने 99.95 टक्के गुण मिळवून यश मिळवले. तसेच संतोष देशनेगी, आर्यन ढगे, अमेय कटारे, प्रशांत वळवेकर, अनिरूध्द दास, वेदांत कोकाटे, सोहन निवर्गी, मयांक शिवहरे, श्रेयस ग्रामपुरोहित, तनिष्क चौधरी, दिशा शिरस्कर, धृव कुलकर्णी, कुश शहा, वंश गंगवाल आदींनी 99 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.