पुणे – अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई मेन परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, या परीक्षेसाठी 22 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहील, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
जेईई मेनचे पहिले सत्र 22 ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे, तर दुसरे सत्र 21 ते 8 एप्रिल दरम्यान होणार आहे. परीक्षेची अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर दुरुस्ती विंडो उघडली जाईल. या कालावधीत उमेदवार अर्जात बदल करू शकतात. त्यासाठी शुल्कही जमा करावे लागणार आहे, अशा सूचना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केल्या आहेत.
जेईई परीक्षेचा फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी उपाय दिला आहे. अर्ज करताना काही विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार कार्डावर दिलेले नाव आणि इयत्ता दहावीच्या प्रमाणपत्रावर नोंदवलेले नाव यात तफावत आढळून आली होती. त्यामुळे उमेदवारांना फॉर्म भरण्यात अडचणी येत आहेत. ही बाब विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्याबाबत सर्व सूचना नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.