बिहारींनी काम थांबवल्यास दिल्ली ठप्प होईल-नितीश

नवी दिल्ली -देशाची राजधानी असणारी दिल्ली संपूर्ण देशाची आहे. इतर राज्यांतील नागरिकांप्रमाणेच बिहारी लोक दिल्लीत मोठ्या संख्येने राहतात. बिहारींनी एक दिवस जरी काम थांबवले तरी दिल्ली ठप्प होईल, असा दावा बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी बुधवारी केला.

पुढील वर्षी होणारी दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जेडीयूने घेतला आहे. त्यासाठी सज्ज होण्याच्या उद्देशाने झालेल्या जेडीयू कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नितीश बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यासाठी अनुकूलता दर्शवली. दिल्लीत दारूबंदी लागू करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली. दारू अतिशय वाईट असल्याने आम्ही बिहारमध्ये दारूबंदी अंमलात आणली. महिलावर्गाच्या विनंतीमुळे आम्ही ते पाऊल उचलले.

त्यामुळे बिहारमधील गृहकलहात घट झाली. त्याशिवाय, कायदा आणि सुव्यवस्था स्थितीतही सुधारणा झाली. दारूबंदी ही अतिशय महत्वाची बाब आहे. संपूर्ण देशात ती लागू करायला हवी. दिल्लीत ती का केली जाऊ नये, असा सवाल नितीश यांनी केला. बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप एकत्रितपणे सत्तेवर आहेत. मात्र, दिल्लीत ते मित्रपक्ष एकमेकांविरोधात दंड थोपटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.